मालेगाव परिसरात यंदा पावसाचे प्रमाण चांगले होते. परिणामी पाण्याचा मुबलक पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, हरभरा, कांदा ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. सर्वच क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. क्षेत्र वाढले पण विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी मात्र विजेचा नियमित पुरवठा होत नसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांना पाणीपुरवठा करताना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
दिवसा तीन ते चारवेळा विद्युत पपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा होत नाही. एक दिवसाचे काम दोन दिवसाने पूर्ण होते. पाणी भरणारे रोजंदार कामगार साधारणपणे ३०० रुपये रोज घेतो. त्यांना ठरल्याप्रमाणे रोज द्यावाच लागतो. मात्र वीज नसल्याने तो बसून असतो. परिणामी शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मालेगाव तालुक्यात छोट्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. विद्युत दाब कमी असल्याने पाणीपुरवठा पाहिजे त्याप्रमाणात होत नाही. त्यातच अनधिकृत वीज जोडण्याची संख्या ही मोठी आहे. त्याचा फटका प्रामाणिकपणे अधिकृतपणे वीज जोडणी घेणाऱ्यांना बसत आहे. वीजपुरवठा नियमित मिळावा, अशी मागणी मनमाड चौफुली भागातील शेतकरी अशोक सावकार, प्रशांत पाटील, देवमन पवार, सचिन पाटील, अरविंद खैरनार यांनी केली आहे.