लासलगाव : मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरण अवलंबविले असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी लासलगाव रेल्वेस्थानकावर वीस मिनिटे रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेने शरद जोशी यांनी केले.कांदा, बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या. सुमारे वीस मिनिटे मनमाड - इगतपुरी शटल अडवल्याने रेल्वेसेवा चांगलीच ठप्प झाली होती. औषधांचा जीवनावश्यक यादीत समावेश नाही; पण कांद्याला जीवनावश्यक केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात प्रांतिक अध्यक्ष गुणवंत पाटील, महिला आघाडीच्या प्रांतिक अध्यक्ष शैलजा देशपांडे, बाजार समिती सभापती नानासाहेब पाटील, संचालक बबनराव सानप, रामचंद्र पाटील, वामनराव चटप, डॉ. गिरीधर पाटील, संजय कोल्हे, स्मिता गुरव, चंद्रकांत गुरव, जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील, निर्मला जगताप, संतू पाटील झांबरे, शिवाजीराव राजोळे, विशाल पालवे सहभागी झाले होते.बाजार समिती सभागृहात मेळावासत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा भाव २०० ते ३०० रुपयांनी घसरले असल्याचा आरोप करून कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शरद जोशी यांनी दिला.शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करीलच, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन मेळाव्यात जोशी यांनी केले. रामचंद्र पाटील, दिनेश शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे रवि देवांग, अर्जुन बोराड, भाऊसाहेब चव्हाण उपस्थित होते. कसमा पट्ट्यातून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)