कुकाणे : इंधनाचे दर वाढल्याने यंत्रावरील शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. ग्रामीण भागात बैलांची संख्या कमी होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला. बैलजोडी उपलब्ध नसल्याने जवळ जवळ सर्वच शेतकरी वेळ वाचवण्यासाठी व आधुनिक शेतीची कास धरताना दिसत आहेत. परिणामी, उत्पन्नाचे गणित बसत नसल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. शेतीची कामे पूर्वी बैलजोडीने करत असल्याने मशागतीसाठी फारसा खर्च येत नव्हता. शेती जास्त असल्याने बैलजोडी सांभाळणे शक्य होत असे. मात्र, बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण झाले. जमिनीच्या वाटण्या झाल्या. अशा अनेक प्रकाराने शेतकरी अल्प भूधारक झाला आणि शेतात बैलाऐवजी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागला. मागील दशकापासून यंत्राचा वापर वाढल्याने चार दिवसांत व्हायची कामे आता काही तासात पूर्ण होऊ लागली. एक पीक काढले की एका दिवसात मशागत करून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयार केली जात आहे. नांगरणी, कोळपणी फवारणी, सध्या इंधनाचे दर वाढल्याने अनेक यंत्र हे इंधनावर असल्याने त्याचा परिणाम झाला आहे.
-------------------------
शेतकऱ्यांना फटका
बहुतांश ठिकाणी इंधनाचा दर हा कमी जास्त आहे. याचा परिणाम शेतकरी राजावर होत आहे. कोरोनामुळे टाळेबंदी, अवकाळी पाऊस, बाजार भाव कमी, अशा अनेक समस्यांमुळे शेतकरी आधीच हवालदिल असल्याने त्यात अजून इंधन वाढीमुळे शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे.