राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांची शेती पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. राजापुर परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या कृपेवरच येथील शेती केली जाते. बºयाच शेतकºयांनी शेततळे तयार करून पाणी साठवले व या पाण्यावर ते दरवर्षी उन्हाळ कांदा लागवड करतात. उन्हाळ कांदा उळे टाकण्यापासून ते काढणी व साठवणीपर्यंत लाखावर होणारा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.यावर्षी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक उन्हाळ कांदा खराब झाला आहे. कांदा चाळीतून बाहेर काढून उन्हात कागदावर वाळत टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी मजूर मिळत नसल्याने घरच्या मंडळींना कामे करण्याची वेळ आली आहे.-----------------दहा एकर उन्हाळ कांदा लागवड केलेली होती. २५ ट्रॅक्टर कांदा साठवणूक केली होती पण आज निम्यापेक्षा जास्त प्रमाणात कांदे सडले आहेत व केलेला खर्चही वसूल होणार नाही. त्यात बाजार भाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.- माधव अलगट, शेतकरी, राजापूर
कांदा चाळीतच सडल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 9:05 PM