मागील काही वर्षांपासून अनेक नैसर्गिक संकट, अवकाळी पाऊस ,कीड आणि अन्य रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असताना देखील अद्यापही शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांच्या जाचक अटी असल्यामुळे शेतकरी अद्यापही नुकसानभरपाई पासून वंचित राहत आहेत. येवला तालुक्यात २०२० मध्ये खरीप हंगामातील पिके सोंगणीला आलेली असताना अतिवृष्टी झाल्यामुळे मका, कापूस, बाजरी, भुईमूग, तूर, उडीद, सोयाबीन आदी उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. पीक विम्याचे पैसे भरूनही अद्यापही पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन येवला तालुका कृषी अधिकाऱ्यांना मराठा मावळा संघटनेच्या वतीने देण्यात आले. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करावी, अन्यथा पीक विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा मावळा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष देविदास गुडघे, दीपक उगले आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते.
नुकसानभरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:13 AM