कळवण (नाशिक) - कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदार यांनी कळवण तालुक्यात पाय ठेवू नये असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी कळवण एस टी बस स्थानकाजवळ तासभर रास्ता रोको आंदोलन केले आहे.
मुख्यमंत्री 2 डिसेंबर रोजी नांदूरी येथे महाआरोग्य शिबिरास येत असल्याने कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा संतप्त शेतकरी बांधवांनी दिला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयातील पायरीवर ठिय्या आंदोलन करुन शेतकरी बांधवांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कांदाला हमीभाव द्यावा व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी केली.
तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रविंद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, मोहन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, विलास रौदळ उपस्थित होते.