मेशी : देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले होते. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांची आणि पिकाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.
या पार्श्वभूमीवर शेतकरी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून महसूल विभागाने भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने पाहणी न करता माहिती शासनाला पाठविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बरेच लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहिले असल्याची शेतकऱ्यांची तक्रार केली आहे.
डोंगरगाव येथील ७५०पैकी केवळ १५८ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. सलग पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असताना सदर विभागाच्या अधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. या भागातील शेतकरी पहिल्या अनुदानापासून अजूनही वंचित आहेत. शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप होत असून, असा भेदभाव केला जात असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
डोंगरगाव सरपंच दयाराम सावंत, मेशीचे लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित अधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.