लोकमत न्यूज नेटवर्क
न्यायडोंगरी : गेल्या खरीप हंगामात पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांकडून काढलेल्या पीकविम्याबाबत सांगितले तसे प्रत्यक्षात न केल्यामुळे मोजक्या शेतकऱ्यांनाच अल्पप्रमाणात पीकविम्याचा लाभ मिळाल्याने असमाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून खऱ्या अर्थाने शेतकरी पीकविम्याकडे वळला आहे. मागील वर्षी २०१९-२० मध्ये ४१ हजार शेतकऱ्यांनी, तर २०२०-२१ मध्ये १९ हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले, त्या वेळेस शासनाने लागलीच नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करून रीतसर पंचनामे केले गेले. परंतु विमा कंपनीचे प्रतिनिधी ग्रामपालिका कार्यलयात आले. शेतकऱ्यांनी रितसर पंचनामा करण्याचा आग्रह धरला होता. परंतु त्यांनी काहीही हालचाल न करता केवळ कागदी घोडे नाचवले. कंपनीने दिलेला संपर्क नंबर लागत नाही, याशिवाय नांदगावसाठी प्रतिनिधी दिला आहे त्याचा तो नंबर असल्याचे कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगितले जायचे. अशावेळी नुकसानीचे गाऱ्हाणे मांडायचे कोणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. विमा कंपनीने भरपाई देतानाही दुजाभाव केलेला आहे. एकाला विम्याचा लाभ दिला तर दुसऱ्याला डावलले. सन २०१९ ते २०२० या खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीची शासन स्तरावरून कृषी खाते, महसूल खाते यांनी केलेले पंचनामे गाह्य धरून विमा कंपनीने नुकसानभरपाई भरून द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट...
पीकविम्यासंदर्भात अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देतात. पीकविम्यासंदर्भात गठित केलेली तालुकास्तरीय समिती शेतकऱ्यांना माहीत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन सत्य लपविण्यात येते. यासाठी प्रत्येक गावाच्या तलाठी कार्यालयात सदर समितीच्या पदाधिकाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक असलेला फलक दर्शनी भागात लावायला हवेत.
- जगन पाटील, प्रगतिशील शेतकरी, न्यायडोंगरी
नांदगाव तालुक्यासाठी सदर विमा कंपनीने नांदगाव येथे कार्यालय सुरू केले आहे. त्यासाठी एक तालुका प्रतिनिधी दिला आहे. विमाविषयी काही तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क न झाल्यास कृषी व महसूल विभागाकडे संपर्क साधावा.
- जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव