खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा कोबी बरोबर टमाटे उत्पादन घेणारे गाव म्हणून इतर राज्यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस गारपीट, आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळींब आदि नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. तेव्हा शेतकरी कोबी, टमाटे आदि पिकांची लागवड करून त्यातून त्याला भाव मिळून चांगला पैसा मिळत असे. परंतु यावर्षी सर्वच पिकांचे भाव कोसळल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. खामखेडा या परिसरातील एका वेळेस शेतकरी डाळींब पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होती. त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. परंतु डाळींब पिकावर तेल्या रोगामुळे खामखेडा परिसरातील डाळिंबाच्या बागा पूर्णपणे उपटून फेकून दिल्याने त्याचा परिणाम उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने कांद्याबरोबर भाजीपाला वर्गीय पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने उन्हाळी कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. त्यामुळे कांद्यावर झालेला खर्चही भरून निघाला नाही. परंतु कोबीचे पीक हाती आले आणि कोबीचे भावही कोसळले. तेव्हा शेतकऱ्याने लाल कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु लाल कांद्याला पाहिजे भाव मिळत नसल्याने लाल कांद्याचे पीकही तोट्यात गेले.कारण डाळिंबाची पिके तेल्या रोगामुळे नष्ट झाल्याने शेतकर्याला आता कांदा, कोबी, किंवा टमाटे पिकाशिवाय पर्याय नाही. कांद्या पाठोपाठ कोबीचेही भाव कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त टमाटे पिकावर होती. जून-जुलैत टमाट्याला हजार ते पंधराशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत भावाने विकला गेल्याने शेतकऱ्याने टमाटे पिकांची लागवड केली. सुरुवातीला टमाट्याची रोपे खराब झाली. परंतु पुन्हा रोपे टाकून लागवड केली. ४टमाट्याचे पीक चांगले आले. सुरुवातीला थोड्या प्रमाणात टमाटे निघत होते. तेव्हा बाजारही चांगला मिळत होता. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात निघू लागल्याने टमाट्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने भाव प्रति कॅरेट पन्नास ते साठ रु पयांवर येऊन ठेपल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. एका कॅरेटमध्ये साधारण वीस किलो टमाटे मावतात. तेव्हा टमाटे एक ते दोन रुपये किलो भावाने विकला जात आहे. काही वेळेस बाजारात टमाटे विक्र ीसाठी नेले असता व्यापारी घेत नसल्याने ते शेतकऱ्याला रस्त्यात फेकून द्यावे लागतात. उत्पादन खर्चाचा विचार करता कांदा, कोबी पिकाच्या पाठोपाठ टमाट्याचे पीकही तोट्यात आहे. यामुळे टमाटे पिकावर केलेला खर्चही निघणार नाही, त्यामुळे शेती व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. शेतात कोणते पीक करावे हा प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर
By admin | Published: February 11, 2017 11:38 PM