सटाणा/नामपूर : उन्हाळ कांद्याचे भाव अडीचशे रुपयांवर आल्याने व भावात दररोज घसरण सुरूच असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अचानक विक्रीला आणलेला कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर फेकून संताप व्यक्त केला.बाजार समितीत चारशेहून अधिक वाहने कांद्याची आवक होती. दुपारी साडेबारा वाजता लिलाव सुरू झाले; मात्र कांद्याचे भाव प्रतिक्विंटल अडीचशे रुपयांच्या वर न गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर फेकून संताप व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, संचालक भाऊसाहेब अहिरे यांनी शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते.त्यानंतर सभापती कापडणीस यांनी कांदा भावाच्या पुकाऱ्याबाबत सक्त सूचना देत योग्य भाव न पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन केल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आले. आंदोलनात प्रा. गुलाबराव कापडणीस, रितेश कापडणीस, अभिमन पगार, मधुकर कापडणीस, पंढरीनाथ अहिरे, प्रवीण सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
नामपूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम
By admin | Published: September 09, 2016 12:27 AM