मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर, पिंपळगाव लेप आदी परिसरांतील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागलेली असून गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या असल्याचे दिसून येत आहे. येथील परिसरात यंदा तब्बल महिनाभर उशिराने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, मूग आदी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊसच न पडल्याने थोड्याफार रिपरिपीच्या पावसाच्या भरवशावर येथील परिसरातील पेरण्या उशिरा झाल्या आहेत.
वातावरणात सातत्याने बदल होत असून सकाळीसकाळी आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून येत असले, तरी दिवसभर जोरदार वारा आणि अधूनमधून कडाक्याचे ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत काहीशी भर पडत आहे. दिवसभरातून एक दोनदा पडणाऱ्या पावसाच्या रिपरिपीवर सध्या शेतकरी मका, सोयाबीनसह आदी पिकांना खते टाकण्याच्या कामांत शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मक्याला टाकण्यासाठी युरियाची टंचाई भासत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. युरिया खरेदी करायचा असल्यास आधी दुसऱ्या खतांच्या गोण्या खरेदी केल्या, तरच त्यावर युरियाची गोणी देत असल्याची माहिती शेतकरीवर्गाकडून देण्यात येत आहे.
-----------------
मका पिकाची लागवड
यंदा येवला तालुक्यात मका आणि सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मक्यावर गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असला तरी यंदादेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली असल्याचे दिसून येत आहे. सध्या मागील काही दिवसांपासून बाजार समित्यांत सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव मिळत असल्याने सोयाबीन पिकाच्या पेरणी क्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनला लासलगाव बाजार समितीत नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडून हेच भाव कायम राहावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
---------------------------
येवला तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी युरिया खताची टंचाई जाणवत होती. मक्याला युरिया घेण्यासाठी कृषी दुकानात गेल्यास दुकानदार दुसऱ्या खतांच्या गोण्या घ्या, मग युरिया देतो, असे सांगत होते. इतर कोठेही युरिया मिळत नसल्याने वणवण करून हतबल होऊन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून युरिया गोणी कोठे मिळेल, याची माहिती घेतली. तेव्हा मला युरिया गोणी मिळाली. प्रशासनाने सर्वत्र युरिया खतांचा मुबलक पुरवठा वाढवून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्या.
-------- मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना, येवला
------------------
फोटो : जऊळके येथे पावसाच्या रिपरिपीवर मक्याला खाद टाकताना मच्छिंद्र जाधव समवेत शेतकरी. (३१ मानोरी)
310721\31nsk_18_31072021_13.jpg
३१ मानोरी