नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात मृग नक्षत्रात तसेच त्यापूर्वी पडलेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवड उरकली आहे. मात्र, सध्या पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे पिकांचे उगवलेले कोवळे अंकुर कोमेजले असल्याचे चित्र आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून चातकाप्रमाणे ते पावसाची वाट पाहत आहेत.
परिसरातील काही गावांमध्ये जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने खरिपाचे नियोजन पुरते कोलमडले आहे. आर्द्रा नक्षत्रात नांदूरशिंगोटे येथे झालेल्या पावसावर शेतकऱ्यांंनी पेरणी केली. मात्र, पावसाने पुन्हा ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला आहे. पुनर्वसू नक्षत्र सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, दररोज पावसाचे वातावरण तयार होऊनसुद्धा पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.
-------------------
पावसाची प्रतीक्षा
मानोरी, कणकोरी, सुरेगाव, मऱ्हळ, निऱ्हाळे तसेच नांदूरशिंगोटे परिसरातील काही भागांत पर्जन्यमान कमी असल्याने २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या असून काही भागांत अद्याप पेरण्या बाकी आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी व मका या पिकांना प्राधान्य दिले जाते. पेरणीचा कालावधी जवळपास संपायला आला, तरी काही ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाही. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.