दिंडोरी/जानोरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी, भाजीपाल्याचे कोसळलेले दर आणि वीज बिल भरण्यासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकांना भाव नसताना महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या मोटर्सचे वीज कनेक्शन बंद केले आहे. बिले भरल्याशिवाय वीज कनेक्शन चालू होणार नाही, असे महावितरण कंपनीचे कर्मचारी सांगतात, त्यातच पावसानेही शेतकऱ्यांकडे डोळे वटारून बघितल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून अनेक प्रकारची पिके आपल्या शेतात पिकवली आहेत. परंतु सध्या कोणत्याच पिकांना दर नसल्याने शेतकरी चिंतित असून, महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांचे मोटर वीज कनेक्शन बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी पिकांना पाणी भरावे लागते. तसेच पिकांना वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. परंतु वीज महावितरण कंपनीने दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची थ्री फेज कनेक्शन बंद केल्याने शेतकऱ्यांचे पिके खराब होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पीक सुरू असून, टोमॅटो पिकाला ६० ते ७० रुपये कॅरेटचा भाव असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होतो की नाही? अशी परिस्थिती असताना महावितरण कंपनीने वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांना एका मोठ्या संकटात टाकले आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------------------
सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी द्यावे लागते. परंतु महावितरण राज्य कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. त्यातच केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनाच या संकटांना सामोरे जावे लागत आहे.
- राजकुमार वाघ, शेतकरी, जानोरी
----------------
महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने अचानक शेतकऱ्यांची वीज बंद केली आहे. पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असताना महावितरण कंपनीने वीज बंद केल्याने उभी पिके सुकून चालली आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
- हर्षल आबाजी काठे, शेतकरी, जानोरी
-----------------------------
जानोरी येथील शेतकरी राजकुमार वाघ हे आपल्या शेतातील पिकांना नळीद्वारे पाणी देताना. (२५ जानोरी वॉटर)
250821\25nsk_14_25082021_13.jpg
२५ जानोरी वॉटर