नायगाव : सर्वच शेतमालाला बाजारात सध्या मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही फिटत नसल्याने हवालदिल बळीराजाने फ्लॉवर व कोबीच्या उभ्या पिकात जनावरे सोडून आपला संताप व्यक्त केला जात आहे.महागडे बि-बियाणे,औषधे ,मजुरी आदी सर्व खर्च करून पिकविलेल्या कोबी,फ्लावर,टमाटे आदीसह भाजीपाल्याला बाजारात सध्या कवडीमोल भाव मिळत आहे. खपिाच्या पिकांचे अवकाळीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतक-यांनी रब्बीच्या हंगामात विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या वानांना पसंती देऊन या पिकांची लागवड केली. मात्र हा सर्वच भाजीपाला बाजारात येताच बाजारभाव कमालीचे गडगडले आहे. सध्या कोणताही भाजीपाला बाजारात विक्रीस नेला तर केलेला उत्पादन खर्चाएवढेही पैसे हातात पडत नसल्याने कष्टकरी शेतकऱ्यांना वाहतुकदाराचे व नाश्त्यासाठी खिशातून पैसे भरण्याची वेळ येत आहे.अशा परिस्थतीत माल विकूनही चार पैसे मिळत नसतील तर तो बाजारात न्यायचाच कशाला? अशा विचाराने शेतकरी शेतात उभ्या असलेल्या कोबी, फ्लावर व टमाट्यांच्या शेतात आपली जनावरे सोडत असल्याचे चित्र नायगाव खो-यात दिसत आहे.--------------------अतिशय प्रतिकुल परिस्थतीत महागडी औषधे ,खते,मजुरी आदी खर्च करून पिकविलेल्या कोबी पिकाला सध्या २५ पैसे प्रति किलो ,फ्लावरला १ रूपया तर टमाटा ३ ते ४ रूपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. अशा कवडीमोल भावाने शेतक-यांनी केलेला खर्चही वसुल होत नाही.कष्टाने पिकविलेल्या मालास योग्य दाम मिळत नसल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.--------------------मी तीन एकर कोबीची लागवड केली आहे. सध्या कोबीचे पिक काढणीला आले आहे.मात्र कोणताच व्यापारी खरेदीसाठी फिरकत नाही. काढणीला आलेले पीक बाजारात नेले तर वाहतुकीचा खर्च खिशातून द्यावा लागेल अशी परिस्थती आहे.त्यामुळे ओळखीच्या व्यापा-याला भाव न करता काढण्यास सांगितले आहे.- संतोष मधुकर लोणकर, शेतकरी, नायगाव.
कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 3:15 PM