सचिन सांगळे नांदूरशिंगोटे (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. खरीप हंगामातील पिकांची नासाडी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मात्र घट होणार असल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त भागाची शासनाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी बळीराजाने केली आहेत. नांदूरशिंगोटे येथे गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत 621 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापकात झाली आहे. परिसरात जास्त पाऊस झाल्याने जामनदी दुथडी भरुन वाहत आहेत.
नांदूरशिंगोटेसह परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, चापडगाव, धुळवड, दापूर, गोंदे, माळवाडी, खंबाळे, दोडी, मानोरी, कणकोरी आदी भागात यावर्षी पावसाचे पाणी जास्त असल्याने खरीप हंगामातील पिके जोमाने आली होती. मात्र गणेशोत्सव काळात परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतातील पिकांमध्ये पाणी साचले आहे. भोजापूर धरणही यावर्षी जुलै महिन्यात ओव्हरफ्लो झाल्याने म्हाळुंगी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरु असून तसेच गेल्या दीड महिन्यापासून कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात आलेले आहेत. तसेच पावसाच्या पाण्यानेच परिसरातील पाझरतलाव, बंधारे, केटीवेअर, गावतळे, विहिरी तुडुंब भरल्या असून तसेच दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढे एकरुप होवून ओसंडून वाहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.
अडीच महिन्यात 621 मिलीमीटर पावसाची नोंदपावसाच्या हाहाकार झाल्याने शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचल्याने पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. बहुतांश भागात सोयाबीनसह कांद्याचे रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहेत. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी तसेच दापूर परिसरात गेल्या काही दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. खरीप हंगामातील ऐन मोसमात असणारे पिके मात्र सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खराब होत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसापासून येथे मुसळधार पावसामुळे गुडघ्यापर्यंत पिके पाण्यात होती. प्रामुख्याने द्राक्षा बाग, कांद्याचे रोपे, कोथिंबीर, टोमॅटो, वालवड, सोयाबीन आदीसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहेत. त्यामुळे बळीराजा अस्वस्थ झाला आहे.
सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमाननांदूरशिंगोटे परिसरात नेहमीच दृष्काळसदृश परिस्थिती असते, मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी अधिक आहे. सरासरीनुसार येथे दरवर्षी साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यावर्षी पावसाने सरासरी ओलंडली आहे. जुलै महिन्यात 291, ऑगस्ट महिन्यात 121 तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 209 अशाप्रकारे अडीच महिन्यात 621 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर भोजापूर धरण क्षेत्रातही 700 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे परिसरात सरासरीपेक्षा 25 ते 30 टक्के जास्त पाऊस पडला आहे.