नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांची वानवा असल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, गटाराची व्यवस्था नसल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अॅड. रेखा शिंदे यांनी केली आहे. मार्च २०१५ मध्ये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर येथे स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आली. प्रशासकीय राजवट आहे. नामपूर बाजार समितीअंतर्गत कांदा व डाळींब मार्केट जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन समिती प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु शेतकऱ्यांच्या जिवावर कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. कांदा, डाळींब, भुसार मालांच्या विक्रीसाठी शेतकरी समितीत येत असतात. परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. मार्केटच्या आवारात पाण्याची कमतरता असल्यामुळे उघड्यावर मलमूत्र विसर्जनासाठी जावे लागते. पाण्याअभावी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष शीतल कंकरेज, डॉ. भारती कोर, पुष्पावती गोसावी, अलका कापडणीस, पंचशीला खरे, संगीता अहिरराव, शीला गलांडे, वर्षा मुनोत, तसलिमा बोहरी, भूषण निकुंभ, एजाज बोहरी, शब्बीर बोहरी, संदीप राजपुत, डॉ. नितीन कोर, प्रसाद सोनवणे, शिवाजी सोनवणे, पोपट कापडणीस, भुरा गोसावी आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
बाजार समितीत शेतकऱ्यांची परवड
By admin | Published: December 19, 2015 10:49 PM