नाशिक - शेतक-यांचा ऐतिहासिक लाँग मार्च नाशिक येथून सुरु झाला आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लाँग मार्चमध्ये राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. नाशिक येथील सीबीएस चौकातून निघालेला हा लाँग मार्च सहा दिवस पायी चालून १२ मार्च रोजी मुंबई येथे पोहोचणार आहे. मुंबई येथे पोहोचल्यावर शेतकरी मागण्यांसाठी, विधान भवनाला बेमुदत महाघेराव घालण्यात येणार असल्याची घोषणा किसान सभेने केली आहे.
कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतक-यांना शेतीला पाणी दया, बोंडआळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई द्या, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या लाँग मार्चच्या निमित्ताने शेतक-यांच्या मनात सरकार विरोधात असणारा असंतोष पुन्हा एकदा व्यक्त होत आहे. सरकारने शेतक-यांच्या कर्जमुक्तीची चालवलेली हेळसांड, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील अक्षम्य दिरंगाई, , बोंड आळी व गारपीट ग्रस्तांना मदती बाबत सुरु असलेली उपेक्षा यामुळे शेतक-यांमध्ये मोठा असंतोष असून लॉंग मार्च व बेमुदत घेरावच्या निमित्ताने शेतक-यांचा हा असंतोष व्यक्त होत असल्याचे यावेळी किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले आहे. डॉ. अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत,किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, बारक्या मांगात, इरफान शेख,सावळीराम पवार, सुभाष चौधरी, रतन बुधर, रडका कलांगडा, इंद्रजीत गावीत आदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव विजू कृष्णन हे ही लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत. पहिले तीन दिवस ते पायी चालत या लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहेत. १२ मार्च रोजी लॉंग मार्च मुंबई येथे पोहचेल. तेथे किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार हनन मोल्ला, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक खासदार जितेंद्र चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य माजी आमदार नरसय्या आडम, केंद्रीय कमिटी सदस्य महेंद्र सिंह,अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे आदी नेते या लॉंग मार्चमध्ये सामील होणार आहेत.
लाँग मार्चमध्ये सामील झालेल्या शेतक-यांनी भोजनासाठी लागणारा आपला शिदा स्वत: सोबत आणला आहे. अन्न शिजविण्याची व्यवस्थाही शेतक-यांनी आपसात गट करून स्वत: उभी केली आहे. दररोज किमान ३० ते ३५ किलोमीटर चालण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लाँग मार्चमध्ये सामील होऊ न शकलेल्या राज्यभरातील इतर लाखो शेतक-यांनी आपल्या आपल्या तालुक्यात तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून व निदर्शने करून लॉंग मार्चला पाठींबा व्यक्त करावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.