नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून होणाऱ्या सक्तीच्या कर्ज वसुलीसंदर्भात बुधवारी (दि. २३) प्रशासक प्रताप सिंग चव्हाण आणि उपोषणकर्त्यांमध्ये सुमारे दोन तास बैठक झाली. मात्र, या बैठकीतही कोणताच तोडगा न निघाल्याने शुक्रवार (दि. २५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून होत असलेली सक्तीची कर्जवसुली बंद व्हावी व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नावे लावण्याची प्रक्रिया बंद करावी यासाठी गेल्या १ जूनपासून शेतकरी संघर्ष समिती संघटना व शेतकरी समन्वय समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला तब्बल ८४ दिवस झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत अनेकदा बैठका होऊनही यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यापूर्वी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ नऊ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते.
उपोषणकर्त्यांची व जिल्हा बँकेच्या प्रशासकांची दोन तास बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, आनंदा चौधरी, चंद्रकांत मोरे, जयराम मोरे, रामदास जाधव, चंदू पाटील, नाना बच्छाव व इतर शेतकरी उपस्थित होते.