खासदार हेमंत गोडसे यांच्या घरासमोर सोमवारी सकाळी नाशिक- पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात रेल्वे मार्गाला विरोधच असणार असल्याचा पुनरुच्चार करून येत्या आठवड्यात होणाऱ्या रेल्वेच्या सर्वेक्षणाला विरोध करत सर्वेक्षण करू न देण्याचे ठरविण्यात आले. रेल्वे सर्वेक्षणाला विरोध करून कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण होऊ देणार नसल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, योगेश काळे, विजय गोडसे यांनी सांगितले.
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी बेलतगव्हाण, संसारी, शेवगे दारणा, नानेगाव, वडगाव पिंगळा आदी गावांसह विविध गावातील जमिनी अधिग्रहीत करण्यात येत असून, येथील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत नाशिक- पुणे रेल्वे मार्गादरम्यान बागायती जमीन अधिग्रहीत होत असल्याकारणाने विरोध दर्शविला आहे. यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार गोडसे यांनी ही लोकभावना समजून बागायत शेतातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला विरोधच असल्याचे उपस्थिताना सांगितले. संबंधित ग्रामपंचायतीच्या बैठकीत रेल्वे मार्गाला विरोध असल्याचा ग्रामसभेचा ठराव घेऊन पूर्वीच जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. यावेळी नानेगाव येथील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर शिंदे संसारीचे सरपंच विनोद गोडसे, अशोक आडके, विलास आडके, विजय गोडसे तानाजी गोडसे, योगेश काळे, मुकुंद गोसावी, ज्ञानेश्वर काळे, आनंद गोडसे, विष्णू गोडसे,वासुदेव पोरजे,संजय आडके आदींसह नागरिक उपस्थित होते.