लोकमत न्यूज नेटवर्कजायखेडा : जायखेडा व परिसरातील विविध गावांतील शेतकरी तिसऱ्या दिवशीही संपावर ठाम असल्याचे दिसून आले. अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात येऊन दूध, फळे, भाजीपाला आदींची विक्र ी बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांची आंदोलने झाली. आसखेडा येथील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रात्री १० ते ११ वाजेदरम्यान जायखेडाकडून नामपूरकडे बटाट्याची वाहतूक करणारा ट्रक आंदोलक शेतकऱ्यांनी येथील पुलाजवळ अडविला. जवळपास दोन टन बटाटे गाडीतून काढून रस्त्यावर फेकून दिले. काही संधिसाधूंनी बटाटा भरलेल्या गोण्या घरी वाहून नेल्या, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. जमावास त्यांनी मज्जाव करताच पोलीस व आंदोलकात जोरदार बाचाबाची व धक्काबुक्की झाली. जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमावाकडून दगडफेक झाल्याने पोलीस कर्मचारी व आंदोलक जखमी झाले. दगडफेकीत पोलीस गाडीचा मागचा काच फुटून किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच ते सात आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमपूर येथे आजही शेतकऱ्यांनी संप कायम ठेवत गुजरातकडे कोथंबीर घेऊन जाणारी गाडी अडवून गाडीतील कोथंबीर रस्त्यावर फेकून दिली. शुक्रवारी कांदे घेऊन जाणारी ट्रक अडवून कांदे फेकून देण्यात आले होते. यावेळी शासनाच्या धोरणाचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जायखेड्यात शेतकरी संप कायम
By admin | Published: June 04, 2017 1:24 AM