नाशिकरोड : नाशिक विभाग वृक्षारोपण संदर्भात आढावा बैठकीस वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात येणार असल्याच्या माहितीनंतर नाशिक जिल्हा किसान सभेने हजारो आदिवासींना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक जिल्हा किसान सभेने वनाधिकार कायद्याची २००८ पासून चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी व इतर विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेने हजारो आदिवासी बांधवांचा गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. यापूर्वीच्या किसान सभेच्या आंदोलनाची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी व नियोजन केले होते.दरम्यान नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यात १ जुलै रोजी २ कोटी वृक्षाची लागवड करण्यात येणार असून त्यासंदर्भात नाशिक विभागाच्या आढावा बैठकीला वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगट्टीवार, गृहराज्यमंत्री राम शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे दुपारी ४ वाजेच्या सुमारास येणार असल्याची माहिती किसान सभेला मिळाली.पोलिसांची चांगलीच तारांबळकिसान सभेने हजारो आदिवासींना जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करताच आदिवासी बांधव, महिलांनी खचाखच भरलेली शेकडो वाहने दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या दिशेने निघाली. किसान सभेने ऐनवेळी मोर्चाचे ठिकाण बदलल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाणाऱ्या नाशिकरोड पोलीस ठाण्याशेजारील मेनगेट रस्त्यावर ५०० मीटर अगोदरच रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद केला. तसेच जेलरोड कोठारी कन्या शाळेशेजारून जाणारा रस्ता बंद केला. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. खुद्द आयुक्त एस. जगन्नाथन हे घटनास्थळी दाखल झाले. किसान सभेचे पदाधिकारी व हजारो आदिवासी बांधव विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडविला. पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन द्यायचे आहे असे प्रशासनाला सांगितले. दुपारी ३.३० ते ५.३० पर्यंत मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. साडेचार वाजेच्या सुमारास भारत प्रतिभूती मुद्रणालय सुटल्यानंतर पोलिसांनी प्रेस कामगारांना विनंती करत दुसऱ्या मार्गावरून जाण्यास सांगितले. मोर्चेकरी शिष्टमंडळाची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा होऊन निवेदन दिल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मोर्चेकरी पुन्हा माघारीच्या दिशेने निघाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
किसान सभेचा मोर्चा धडकला
By admin | Published: June 24, 2016 12:05 AM