पेठ : एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात अडतदार व्यापारी शेतकऱ्यांमध्ये कलगीतुरा सुरू असताना पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील शेतकरी मात्र शासनाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर जाऊन निमूटपणे आपले धान्य विक्री करत असतानाचे चित्र दिसत असले तरीही केवळ शासकीय खरेदी होते म्हणून त्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना याही योजनेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.पेठ तालुका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येत असला तरीही या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने कोणत्याही प्रकारची खरेदी -विक्री होत नाही़ शेतकऱ्यांना आपला माल थेट नाशिकला आणावा लागतो़ त्यामुळे अनेक दिवसांपासून पेठला बाजार समिती मंजूर व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असताना संचालक मंडळाने पेठ येथे उपबाजार समिती स्थापन करण्याची घोषणा केली असली तरीही अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांना आजही आदिवासी विकास विभागाच्या एकाधिकार धान्य खरेदी योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे़ पेठ तालुक्यात असे २२ खरेदी केंद्र आहेत़ मात्र या केंद्रांवरील असुविधांनी शेतकरी व कर्मचारीही त्रस्त झाल्याचे दिसून येते.खरेदी केलेले धान्य अक्षरश: उघड्यावर साठवले जात असल्याने पाणीपाऊस, उंदीर-घशी यासारख्या गोष्टींमुळे धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असते़ एकाधिकार खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी कोणतेही निवारा शेड अथवा साधी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध होत नाही़ शासन बाजार समितीला अशा सुविधा पुरवण्यासाठी स्वतंत्र अनुदान देत असली तरीही बाजार समिती याकडे सोईस्कर डोळेझाक करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे़ (वार्ताहर)
शेतकऱ्यांची परवड : उपबाजाराचा प्रस्ताव लालफितीत
By admin | Published: January 31, 2015 11:32 PM