नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने शुक्रवारी (दि. २५) सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह करून त्यांना निवेदने दिली. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने सत्ताधारी भाजपाचे शहरातील आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांच्यासह शिवसेनेचे योगेश घोलप यांच्या घरासमोर ढोल वाजवून सत्याग्रह आंदोलन केले. आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर विधिमंडळात चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मांडण्यात येणारी विधेयके सादर करण्यासाठी तसेच त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्र स्तरावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. भाजपाच्या तिन्ही आमदारांनी आंदोलकांना सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. शिवसेनेचे आमदार योगेश घोलप शहरात नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्वीकारले.तर इगतपुरीत आमदार निर्मला गावीत उपस्थित नसल्याने त्यांच्या कन्या तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावीत यांनी शेतऱ्यांचे निवेदन स्विकारले.शेतकरी आंदोलन समितीने नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिल्यामुळे गेल्या वर्षी १ जून रोजी झालेल्या राज्यव्यापी शेतकरी संपाची तीव्रता पुन्हा एकदा जाणवू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रविवारी पालकमंत्र्यांना निवेदन देणार
शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्ह्यातील आमदारांना निवेदन दिल्यानंतर रविवारी (दि.२७) जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना अशाच प्रकारे निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याही घरासमोर सत्याग्रह करून निवेदन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही भागाचे प्रतिनिधित्व करणारे तथा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनाही मागण्यांचे निवेदन देण्याचे आंदोलन समितीचे नियोजन असून, येत्या १ जूनला नाशिक शहरात गतवर्षाच्या किसान क्रांती मोर्चाच्या शेतकरी संपाची दाहकता जागवणारा मोर्चाही काढण्यात येणार आहे.