सिन्नर: कर्जबाजारी शेतकऱ्यांची विविध बॅँका व पतसंस्थांकडून करण्यात येणारी धडक वसुली मोहीम थांबविण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार पक्ष व सिन्नर-शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सलग सातव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवण्यात आले. गुरुवारी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:चे सरण रचून त्यावर बसत अनोखे आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सिन्नर तालुक्यातील दुष्काळी शेतकरी, गोरगरीब जनतेची कर्ज व वीज वसुली व मालमत्ता जप्ती थांबावी, व्यापारी बॅँक व पतसंस्था यांच्यातील बोगस कर्ज प्रकरणांची चौकशी करून संबंधित संचालक व व्यवस्थापक यांच्यावर कारवाई व्हावी, फसवणूक झालेल्या कर्जदारांना न्याय द्यावा, या मागणीसाठी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला होता. पाच दिवस आमरण उपोषण केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. जाेपर्यंत सर्वसामान्य कर्जदार व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शरद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आहे. या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन प्रहार पक्ष व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बच्चू कडू यांना भेटणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दोन वर्षे संपूर्ण देशात कोरोनाने लॉकडाऊन होता. शेती, दुकान, नोकरी, व्यवसाय बंद होते. आज तीन महिने उलटले पाऊस नाही. यामुळे उत्पन्न नाही. बॅँका, पतसंस्था, फायनान्स यांची धडक वसुली मोहीम सुरू असल्याने सर्वसामान्य कर्जदार हादरले आहेत. शेतकरी, गोरगरीब जनतेच्या कुटुंबांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप शिंदे यांनी आंदोलनाप्रसंगी केला.
यावेळी शेतकरी शिवाजी गुंजाळ, सुरेश सानप, गणेश सानप, बापू सानप, सुनील महाराज, जयदेव मानेकर, भास्कर उगले, पंकज पेटारे, नामदेव सानप, संजय कदम, दत्ता गुंजाळ, रामदास उगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------
आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या
सिन्नर तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी यांचे घरदार व शेती वाचविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सलग सातव्या दिवशीही या उपोषणाची दखल घेतली न गेल्याने शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी लाकडाचे सरण रचून त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासानाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. बोगस कर्ज वाटणारे व ते हडप करणाऱ्या संचालक व व्यवस्थापक यांना अटक करा, नाहीतर ‘आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या’ अशी मागणी यावेळी करण्यात आली.
------------------
फोटो ओळी- सिन्नर तहसील कार्यालयासमोर सरण रचून आंदोलनात सहभागी झालेले प्रहार पक्षाचे शरद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी. (०२ सिन्नर प्रहार)
020921\02nsk_30_02092021_13.jpg
०२ सिन्नर प्रहार