नाशिक : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, कृषी अभियंता राजाराम पाटील, डॉ. प्रकाश कदम आणि कृषी विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन , संशोधन केंद्रावरील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी कमी करणे आणि कृषी संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभाग प्रयत्नशील असतात. परंतु कृषी विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे गुणोत्तर खूपच जास्त असल्याचे चित्र आढळते. त्यामुळे गावपातळीवर कृषी शास्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चांगले कृषी विस्तार कार्यकर्ते तयार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखून कार्यक्रमांची आखणी करणे आणि सुयोग्य विस्तारपद्धत वापरून ते राबविणे या प्रशिक्षणामुळे शक्य होईल अशी आशाही कुलगुरू वायुनंदन यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी विस्तार सेवांची गरज, लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखणे, कार्यक्रमांची आखणी करणे, आद्यरेषा प्रात्याक्षिके, शेती व्यवसायाला पूरक घटक व त्यांचे व्यवस्थापन, शेतमाल विपणनातील अडचणी व उपाय, नैसर्गिक साधनस्रोत व्यवस्थापन यासंबंधी संपूर्ण कौशल्य या प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : इ. वायुनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:31 PM
शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तीस दिवस प्रशिक्षणकृषी कार्यकर्त्यांसाठी ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ शिबीर