ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांनी आता बाजारात ज्या पिकाला मागणी आहे, तेच पिकवून थेट विक्री करावी. स्वतःच्या पायावर शेतकऱ्यांनी उभे राहून कृषी विभागाच्या गट शेती, फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी उभारणे, अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.
ब्राह्मणगाव येथे ह्यविकेल ते पिकेलह्ण या संकल्पनेतून शेतकरी हरी संतोष अहिरे यांनी उभारलेल्या विक्री स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी येथील धांद्री रोड, बई डे शिवारात शेतकरी हेमंत अहिरे यांच्या शेतात बांदावर भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.
या प्रसंगी आमदार दिलीप बोरसे व कृषी, विद्युत खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ब्राह्मणगाव येथून जाणाऱ्या धांद्री रोड परिसरातील शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन भुसे, बोरसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांनी रात्री, अपरात्री पिकांना पाणी देताना शेतीपंपासाठी विजेचा कमी दाबाचा पुरवठा होत असल्याचे सांगितले तर या परिसरात रात्रीच्या वेळी कुठलेही सिंगलफेज मिळत नसल्याचा पाढा वाचला.
ब्राह्मणगावला वीज उपकेंद्र मंजूर असून, निधीअभावी काम रखडले आहे, तर गावाला शेतशिवारात अजमेर सौंदाणे, लखमापूर, महालपाटणे, वासूळ, सटाणा या पाच उपकेंद्रातून शेतीपंपासाठी वीज पुरवठा केला जातो; पण या पाचही उपकेंद्रातून होणाऱ्या पुरवठ्याचे ब्राह्मणगाव शेवटचे टोक असल्याने कधी कमी दाबाचा वीज पुरवठा तर वारंवार वीज पुरवठा खंडित असे प्रकार घडत असल्याने मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे परिश्रम व मेहनत वाढत चालली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर भुसे यांनी याबाबत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी भुसे यांचा माजी सरपंच हेमंत अहिरे यांच्या हस्ते तर बोरसे यांचा मधुकर नवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज ठाकरे, महावितरण विभागाचे सहायक अभियंता दीपक गांगुर्डे, बाबूलाल नागरे, संजीव पडवळ, डी.जे.देवरे मालेगाव, तालुका उपस्थित होते.