इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, भरवीर, पिंपळगाव, शेणित, घोटी खुर्द येथील अनेक शेतकऱ्यांनी या मोबाईल ॲपमध्ये आपल्या शेतामध्ये धानाची लागवड केल्याची नोंद केल्याने ती नोंदणी रद्द झाली असून, यामध्ये भात ही लागवड करायची आहे. परिसरामध्ये धान हा शब्द परिचित आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा यामध्ये सुधारणा करून नव्याने नोंदणी करण्याची वेळ आली आहे.
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसून, त्या शेतकऱ्यांना इतरांकडे नोंदणीसाठी जावे लागत आहे. किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन नोंदणी करायची आहे. आता शेतकरी शेतातील कामे बाजूला सारून आपल्या सातबारामध्ये पिकाची नोंदणी करण्यासाठी भटकताना दिसत आहेत.
ही नोंदणी झाल्यावरसुद्धा संबंधित तलाठी जोपर्यंत मंजुरी देणार नाही, तोपर्यंत त्या सातबारामध्ये नोंद होणार नाही. अनेक शेतकऱ्यांनी नोंद केल्यानंतर आपला सातबारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये गेले. मात्र, त्यांना सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे ही नोंदणी ऐच्छिक ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक सुशिक्षितानासुद्धा या ॲपवर नोंदणी करणे जिकिरीचे होत आहे, हे विशेष. त्याचप्रमाणे बहुतेक शेतकऱ्यांना मोबाईलमधील ॲपस् वापरता येत नसल्याने अडचणी येत आहेत.