ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँक शाखेला कुलूप ठोकल्याची घटना मंगळवारी घडली. तीन महिने उलटून गेल्यानंतरही बॅँकेत पुरेसे पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सदर आंदोलन केले. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव येथे जिल्हा बॅँकेची शाखा आहे. ठाणगाव बाजारपेठ असल्याने व परिसरातील गावांचा संपर्क असल्याने येथील जिल्हा बॅँकेत दैनिक व्यवहारासाठी गर्दी असते. बॅँकेतील पैसे मिळावे यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जात होता; मात्र त्यानंतरही खातेदारांना पुरेशी रक्कम न मिळाल्याने मंगळवारी दुपारी संतप्त शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना बॅँकेत कोंडले. विभागीय अधिकारी राजेश नवाळे, बॅँक निरीक्षक दिलीप शिंदे यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर तातडीने दीड लाख रुपयांची रक्कम शाखेत पोहोच करण्यात आली. यानंतर टाळे खोलून कर्मचाऱ्यांना मुक्त केले. आंदोलनात ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे, आडवाडी या गावातील खातेदार शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी ठोकले ठाणगाव शाखेला टाळे
By admin | Published: February 09, 2017 12:12 AM