मालेगाव : तालुक्यातील खडकी येथील शेतकरी संदीप बाबूराव शेळके (३५) याने कर्जाला कंटाळून सोमवारी सायंकाळी आपल्या शेतातील निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्त्या केली.शिवसेनेचे सुनील देवरे यांनी तहसील कार्यालयात माहिती दिली. संदीप शेळके हा खडकी येथे आई-वडिलांसह एकत्र कुटुंबात राहत होता. त्याच्या वडिलांच्या नावावर दहा एकर शेती असून, तो घरातील कर्ता पुरुष होता. शेतात पाइपलाइन टाकण्यासाठी त्याच्या वडिलांच्या नावावर सोसायटीचे साडेपाच लाखांचे कर्ज तीन वर्षांपासून थकले होते. नापिकी व कर्जामुळे तो कंटाळला होता. घरातील दोन भाऊ व एका बहिणी लग्न करण्याचे बाकी होते. काल सायंकाळी कांदा लागवडीचे काम सुरू असताना संदीप शेळके याने मक्याच्या पिकाजवळील निंबाच्या झाडाला बैलांना बांधण्यात येणाऱ्या दोराने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.बराचवेळ होऊनही संदीप परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता सदर प्रकार उघडकीस आला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक सूर्यवंशी करीत आहेत. (प्रतिनिधी)
खडकी येथील शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: September 16, 2015 11:02 PM