लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील उंदीरवाडी येथील शेतकरी बापूसाहेब अण्णासाहेब सोनवणे (देशमुख) यांचा मृतदेह पिंपळगाव जलाल शिवारातील रेल्वेलाइनवर आढळून आला. रविवार, दि.१८ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास रेल्वेखाली एकजण सापडून मृत झाल्याची सूचना पोलिसांना रेल्वे प्रशासनाकडून मिळाली. रात्री तपासामध्ये सदर मृतदेह उंदीरवाडी येथील बापूसाहेब सोनवणे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. मयत बापूसाहेब यांच्या खिश्यामध्ये त्यांच्या जमीनीचा सातबारा व स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो असल्याची माहिती आहे. मयत शेतकरी बापूसाहेब यांच्यावर पावणेदोन लाखाचे तर मुलाच्या नावावर लाख रु पयांच्या आसपास सोसायटीचे कर्ज असून खाजगी देणेदारीही होती. शेतीत मिळणारे अल्प उत्पन्न कर्जमाफीच्या निकषाबाबत उलटसुलट चर्चेमुळे बापूसाहेब वैफल्यग्रस्त झाले असल्याची चर्चा परिसरात आहे. कर्ज फेडण्यासाठी जमिनीचा एक तुकडा विकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा होती. आर्थिक ओढाताणीमुळे बापूसाहेब यांनी आत्महत्या केल्याचा संशय नातलग व्यक्त करीत आहेत.
उंदीरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 20, 2017 12:28 AM