नाशिक : खुल्या बाजारात मकाला चांगला दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर केवळ १९२३ क्विंटल इतकीच मका खरेदी झाली आहे. जिल्ह्यात हमी भावाने ३० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. केंद्रांनी संदेश पाठविलेल्या ५३६ पैकी केवळ ५८ शेतकऱ्यांनीच या खरेदी केंद्रांवर मका विक्री केली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मकाला सरासरी १८०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. तर शासकीय खरेदी केंद्रांवर १८५० रु हमीभावाने मकाची खरेदी केली जात आहे. काही बाजार समित्यांमध्ये काहीवेळी या दरापेक्षा अधिक दर मिळतो. शिवाय पैसेही रोख स्वरुपात मिळत असल्याने शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीस अधिक पसंती देत आहेत. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला जिल्ह्यासाठी देण्यात आलेले ३० हजार क्विंटल खरेदीची उद्दिष्ट पूर्ण होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील महिन्यापासून खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरु होती. या काळात एकूण ६५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५३६ शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी आणावा, असे संदेश पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५८ शेतकऱ्यांनीच माल विक्रीसाठी आणला आहे. १९२३ क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून, २९ लाख ४६ हजार १२५ रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. गहू विक्रीसाठी केवळ येवल्यात १ आणि देवळा येथे ३ अशा एकूण चार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी देवळा येथील खरेदी केंद्रावरून तीन शेतकऱ्यांना गहू विक्रीसाठी आणण्यासाठी संदेश पाठविण्यात आले होते, पण एकाही शेतकऱ्याने या ठिकाणी गहू विक्रीसाठी आणला नसल्याने अद्याप गव्हाची खरेदीच झालेली नाही.
शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:06 AM
खुल्या बाजारात मकाला चांगला दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर केवळ १९२३ क्विंटल इतकीच मका खरेदी झाली आहे.
ठळक मुद्देखुल्या बाजारात मक्याला चांगला दर