वाडीवऱ्हे : परिसरात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. भात लावण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे भात उत्पादनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे. मात्र, या वर्षी दीड महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भात लावणीची कामे खोळंबली असून, टाकलेली भात रोपे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतकरी चिंतातुर झाले आहेत. एकीकडे प्रचंड महगाई. त्यात मजूर मिळत नाहीत. यांत्रिक शेती महाग झाली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी काळजीत असताना त्यात हे अस्मानी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
---------------------
एकीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे यांत्रिक शेती महाग झाली आहे. मजूर मिळत नसल्याने आणि जे आहेत ते अवाच्या सव्वा मजुरी मागत आहेत. खते, बी-बियाणे प्रचंड महाग झाले आहेत. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे.
-मोहन कारभारी कातोरे, शेतकरी
----------------------
पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, टाकलेली भातरोपे काही ठिकाणी जास्त दिवसांचे झाली आहेत. काही ठिकाणी भातरोपे पाण्याअभावी जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा भातरोपांसाठी बियाणे घेण्यासाठी येऊ लागले आहेत.
-दशरथ दिवटे, कृषी माल विक्रेते