ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही. वळीव पाऊसवगळता दमदार मोसमी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही. पाऊस जसजसा लांबणीवर पडत आहे. तसतशी बळीराजाची चिंता वाढत आहे. या परिसरात प्रामुख्याने भात, नागली, वरई, उडीद, खुरासनी, कुळीद असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके घेतली जातात. पाऊस लांबल्याने या पिकांना मोठा फटका बसत आहे.ज्या शेतकऱ्यांकडे वीजपंप आणि पाण्याची सोय आहे त्यांनी वीजपंपाच्या मदतीने पाणी भरून भात लावणी केली आहे. तरीदेखील पीक जगेल की नाही याबाबत साशंकताच आहे. जुलै महिन्यात या परिसरात संततधार पाऊस होत असतो. अनेकदा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन जाते.यंदा मात्र जुलै मध्येही कडक उन्हाळा जाणवत आहे. या कडक उन्हाचा मोठा फटका पिकांना बसत असून उत्पादनावरदेखील त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकºयांची आतापासूनच घालमेल सुरू झाली आहे.अगोदरच कोविड -१९ संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजंदारी मिळत नाही त्यामुळे हाताला काम नाही आणि शेतात पीक नाही अशी दयनीय स्थिती सध्या परिसरातील नागरिकांची झाली आहे. भात, नागली, वरई आदी पिके आदिवासी शेतकºयांची मुख्य पिके मानली जातात. लावणीनंतर तीन ते चार महिन्यांनी ही पिके येतात. या कालावधीपैकी सर्वसाधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पावसाअभावी वाया गेल्याने आता लावणी करूनही उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आणि दुबार लावणी करायची म्हटले तर रोपे शिल्लक नसल्याने तेही शक्य नसल्याचे मत परिसरातील शेतकºयांनी व्यक्त केले आहे.------------------लावणी खोळंबली...शेतकºयांनी सुरु वातीला झालेल्या वळीव पावसानंतर नागली, वरई आदीची रोपे टाकली होती. ती आता लावणी योग्य झाली आहेत; परंतु पावसाअभावी या पिकांची लावणी खोळंबली आहे. ज्या शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर नागली वरईची लावणी केली आहे ती पिके कडक उन्हामुळे करपून जात असून, भात लावणी ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:35 PM