सत्ता आल्यास शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन
By संजय पाठक | Published: March 14, 2024 12:42 PM2024-03-14T12:42:52+5:302024-03-14T12:43:57+5:30
देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले.
नाशिक- देशामध्ये शेतकऱ्यांची आस्था नसलेले सरकार सत्तेवर आहे. यामुळे शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे कर लागू करण्यात आले आहेत. देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे राहुल गांधी यांची एकात्मता यात्रा पोहोचली त्यांच्या यात्रेचे चांदवड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर चांदवड येथील बाजार समितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते
देशातील शेतकरी चहू बाजूनी समस्यांनी घेरला गेला आहे त्यामुळे त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्यास सर्वप्रथम कर्जमाफी त्यांना देण्यात येईल, मात्र केवळ कर्जमाफी घेऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना अन्य उपाय देखील करावे लागतील.
पीक विमा देणाऱ्या कंपन्या या शेतकऱ्यांसाठी असून त्यांच्या भरपाईच्या निकषांचे फेर नियोजन करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना संरक्षण कसे मिळतील याबाबत प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांना जीएसटी लागू करण्यात आला असून उत्पादनांना त्यांना टॅक्स भरावा लागतो हा करही काढून घेण्यात येईल आणि शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना किमान हमीभाव दिला जाईल असेही राहुल गांधी म्हणाले देशातील जवान आणि किसान या दोघांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली जाईल असेही राहुल गांधी म्हणाले.