जागतिक मृदा दिनविशेष
पेठ : वाढते आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उत्पादनाच्या दृष्टीने लाभदायक ठरत असले तरी वारंवार होणारा रासायनिक खतांचा व औषधांचा मारा यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यासाठी दि. ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन साजरा करण्याबाबत कृषी विभागाकडून आदेश पारित करण्यात आले असून, यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जमीन आरोग्यपत्रिका वाटप करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने मृद आरोग्यपत्रिका ही महत्त्वाकांक्षी याेजना राज्यात सन २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये दोन सायकलच्या माध्यमातून सन २०१९ -२० पर्यंत २६४.०१ लाख जमीन आरोग्यपत्रिकांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. सन २०२०-२१ मध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एका तालुक्यातून १० गावांची निवड करून अशा ३५१० गावांमध्ये फक्त जिओ ॲप आधारित प्रात्यक्षिके व शेतकरी प्रशिक्षण याबाबी राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात शनिवारी (दि. ५) मृद आरोग्यपत्रिकेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हा, तालुका व गावपातळीवर लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, मृद तपासणी व खतांचा संतुलित वापर आदी विषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून, कृषी विद्यापीठातील शास्रज्ञ सहभाग घेणार आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपीकता निर्देशानुसार खरीप व रबी हंगामातील प्रमुख पिकांना आवश्यक खत मात्रा शिफारशीचे फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.
या कार्यक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना उदा. मास्क लावणे, वेळोवेळी हॅण्ड सॅनिटायझरचा उपयोग करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
पेठ तालुक्यातील १० गावांची निवड...
पेठ तालुक्यात जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षणासाठी दहा गावांची निवड करण्यात आली असून, यामध्ये रुईपेठा, शेवखंडी, बोरवठ, मांगोणे, निरगुडे, बोरीचीबारी,खिरकडे, वडबारी, मोहपाडा व तोंडवळ या गावांचा समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडल कृषी अधिकारी मुकेश महाजन, डॉ. श्रीरंग वाघ यांनी दिली.
===Photopath===
041220\04nsk_4_04122020_13.jpg
===Caption===
०४ पेठ २