लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला तत्काळ बाजारपेठ उपलब्ध होऊन नुकसान टाळण्यासाठी कृषी माल थेट हवाईमार्गे देशाच्या विविध बाजारपेठांत पाठविण्यासाठी केंद्र सरकारने ‘कृषी उडान’ योजना सुरू केली असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिकसह देशभरातील ५३ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.
देशभरात शेतमालाची योग्य पद्धतीने हवाई मार्गाद्वारे जलद वाहतूक करण्यासाठी कृषी उडान योजना सुरू करण्यात येत असून, त्यासाठी देशातील ५३ विमानतळे जोडण्यात आली आहेत. विमानतळाची धोरणात्मक निवड प्रामुख्याने ईशान्य क्षेत्रावर केंद्रित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या योजनेत उत्तर, संपूर्ण पश्चिम किनारा आणि दक्षिण भारताचा समावेश करण्यात आला आहे. शेतमाल उत्पादित झाल्यानंतर तो साठून राहिला तर त्याचे नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जातात.
यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी शेती उत्पन्न बाजारात नेण्यासाठी ‘कृषी उडान योजना’ उपयोगी ठरणार आहे. या योजनेमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी व्यवहार मंत्रालय, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय यांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादन, फलोत्पादन, मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यासारख्या व्यवसायासंबंधीची विमानाने वाहतूक करणे सोपे होणार आहे. यामुळे शेकऱ्यांना या योजनेचा फायदाच होणार आहे.