सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील सोनारी-सोनांबे सरहद्दीवर विहिरीत पडलेल्या दोन उदमांजरांना शेतकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने जीवदान दिले. सोनारी-सोनांबे शिवारात गुरुवारी रात्री ही उदमांजरे विहिरीत पडली होती. सुभाष जोरवे हे पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी विहिरी जवळून जात होते.
विहिरीतून मांजरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने डोकावून पाहिले असता दोन उदमांजरे विहिरीत कपारीला बसलेली होती. याबाबत वनरक्षक सदगीर, राठोड यांना माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी मांजरांना काढण्यासाठी दोर व पाळणा सोडला. दोर व क्रेटच्या सहाय्याने त्यांना विहिरीबाहेर काढण्यात आले. एकाने दोराचा आधार घेत सुटका करून घेतली. तर दुसरे क्रेटमध्ये बसल्यावर विहिरी बाहेर काढले. बाहेर येतात दोघांनीही धूम ठोकली.