जंतूनाशक फवारणीची मागणी
मालेगाव : शहरात कीटकजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने जंतूनाशक फवारणी करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त राहूल दोरकुळकर यांच्याकडे केली आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तसेच साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. शहरात जंतूनाशक फवारणीचे नियोजन करावे, अशी मागणी योगेश पाथरे, बापू वाघ, कमलेश सोनवणे, श्याम गांगुर्डे, सुनील शेलार, राहूल आघारकर, सचिन कैचे, पोपट सोनवणे आदींनी केली आहे.
शिधापत्रिका पडताळणी मोहीम सुरू
मालेगाव : शहर व तालुक्यातील शिधापत्रिकांची तपासणी व पडताळणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पुरवठा अधिकारी एस. एन. आवळकंठे यांनी दिली. शासनाच्या पुरवठा शाखेच्या विभागाने १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान ही शोध माेहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, अन्नपूर्णा, केशरी, शु्भ्र, आस्थापना कार्ड या विविध प्रकारच्या शिधापत्रिकांसंदर्भात शोध व पडताळणी करण्यात येणार आहे. यात कुटुंबातील लाभार्थी घटकाची माहिती संकलित करण्यात येत आहे. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराकडे विनामूल्य अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी योग्य कागदपत्रे सादर करून तसे कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड, वास्तव्याचा पुरावा सोबत जोडून दुकानदाराकडे जमा करणे गरजेचे आहे. या मोहिमेत अपात्र असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आवळकंठे यांनी दिली आहे.
धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मालेगाव : येथील पोलीस कवायत मैदानावरील ध्वज स्तंभ परिसरात ओट्यावर बसून धूम्रपान, गुटखा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी धूम्रपान, गुटखा व मद्यपी मद्य सेवन केले असल्याचे या ठिकाणी आढळणाऱ्या कचऱ्यावरून निदर्शनास आले आहे. ध्वजस्तंभ परिसरात बॅरेकेटींग करून मैदानावर नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी निखिल पवार, विवेक वारूळे, यशवंत खैरनार, देवा पाटील, गणेश जंगम आदिंनी केली आहे.