शैलेश कर्पे, सिन्नर (नाशिक) : गेल्यावर्षी अतिवृष्टीने खरीप व रब्बी हंगाम हातातून गेला आणि यावर्षी दुष्काळाने मातीत पेरलेले उगवलेच नाही. काही ठिकाणी उगवले तर ते पाण्याअभावी करपून गेले. त्यामुळे दोन वर्षांपासून आम्ही कर्जबाजारी झाल्याची व्यथा सिन्नरच्या शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडल्या.
सिन्नर तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी (दि. १४) सिन्नरच्या दौऱ्यावर आले होते. त्यात दिल्ली येथील कृषी विभागाचे सहायक सचिव प्रिय रंजनदास, डॉ. सुनील दुबे आणि चिराग भाटीया यांचा समावेश होता.
तालुक्यातील भोकणी, खोपडी खुर्द व खंबाळे या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा होता.
भोकणी येथील सुकदेव सानप यांच्या शेतात खरीप हंगामात केलेल्या सोयाबीन पिकांची पथकाने पाहणी केली. समितीने खोपडी खुर्द येथे भीमा गंगाधर दराडे यांनी खरिपात घेतलेल्या बाजरी व मक्याच्या शेताला भेट दिली. दराडे यांनीही खरिपात पिकांची झालेली वाताहत सांगितली.
दौरा घेतला आटोपता :
केंद्रीय समितीच्या पथकाने तालुक्यातील खंबाळे येथील मोठा बंधाऱ्याची पाहणी केली. पाऊस न झाल्याने सदर बंधारा कोरडाठाक होता. त्यामुळे येथील जनावरे व माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अवघड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. समिती पथकाने येवला येथे पाहणी करण्यासाठी उशीर होऊ नये, म्हणून दौरा आटोपता घेत येवल्याकडे धाव घेतली.दोडी खुर्द, मानोरी आणि निऱ्हाळे टाळले...
केंद्रीय पाहणी पथक तालुक्यातील भोकणी, खोपडी खुर्द, खंबाळे त्यानंतर पुढे दोडी खुर्द, मानोरी आणि निऱ्हाळे या गावांना दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. मात्र, खंबाळे येथे दुपारी एक वाजल्यानंतर पथकाने पावले माघारी घेतली. दोडी खुर्द, मानोरी आणि निऱ्हाळे या गावांना जाण्याचे टाळून पथक येवल्याच्या दिशेने रवाना झाले.
१४ सिन्नर दुष्काळ:
सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे दुष्काळाची पाहणी करताना सुकदेव सानप या शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना पथकातील प्रियरंजन दास व त्यांचे सहकारी.