मानोरी : येवला तालुक्यातील वातावरण सातत्याने बदलत असून, दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुके सकाळी ११ वाजेपर्यंत राहात असल्याने रब्बी हंगामातील पिके रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत आहेत, तर या हवामानाचा फटका आरोग्यावरदेखील होत असल्याचे दिसून आले असून, साथीच्या आजाराचे रुग्ण घरोघरी दिसू लागले आहेत.धुक्याबरोबर थंडीचे प्रमाणदेखील वाढले आहे. वातावरणातील या बदलामुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहेत. द्राक्ष आणि कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली असून, कधी कधी रात्रीच्या वेळीसुद्धा औषध फवारणी करावी लागत आहे, तर कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून आले आहे. तसेच नवीन लागण केलेल्या कांद्याचे डोंगळेही सडण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा कांद्याचे दर चांगल्या प्रकारे टिकून असल्याने येवला तालुक्यात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील एक महिन्यापासून कांदा लागवड मोठ्या जोमाने सुरू आहे. अवकाळी पावसाने रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकरी रोपांची शोधाशोध करत असून, रोपे विकत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कांद्याला सध्या बाजारभाव चांगल्या प्रकारे टिकून असल्याने यंदा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलले जात होते.या आशेने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे रोपे तयार करण्यासाठी धावपळ करत होते. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीच्या अपेक्षेवर पूर्ण पाणी फेरल्याने लागवडीसाठी आलेली कांद्याची रोपे अवकाळी पावसाने एका रात्रीतून भुईसपाट झाली तर अनेक रोपे पावसाच्या पाण्याने सडून गेल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांना रोपाअभावी कांदा लागवडीवर ब्रेक लागला आहे. तर काही शेतकरी मिळेल तेथून आणि मिळेल त्या भावाने रोप आणत असून, कांदा लागवडीवर भर देत आहेत.मात्र, सध्या सुरू असलेल्या हवामान बदलामुळे पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने उत्पादन निघेल की नाहीआणि केलेला खर्च निघेल की नाही याची धास्ती शेतकºयांनी घेतली आहे. महागडी औषधे खरेदी करून शेतकरी कांदा पिकावर फवारणी करीत असताना दिसून येत आहेत. ढगाळ हवामानाचा द्राक्ष, कांदा पिकासह रब्बीच्या गहू , हरभरा आदी पिकांना मोठा फटका बसत आहे. धुक्यामुळे नवीन लागवड झालेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे पिके जगविताना शेतकºयांना महागडी कीटकनाशके, बुरशीनाशक व पोषक या औषधांसाठी सुमारे पाच हजार रुपयापर्यंत खर्च होत आहे.एक महिन्यापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने द्राक्षबाग, कांदा, कांदा रोप, गहू, हरभरा पिके धोक्यात आली असून, पिके वाचविण्यासाठी औषध फवारणी सुरू आहे. मात्र, उत्पादन निघाल्यानंतर दर मिळेल की नाही आणि केलेला खर्च सुटतो की नाही याची चिंता आहे.- स्वप्नील कोटमे, शेतकरीपंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, हे वातावरण माणसाच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहे. त्यात अधूनमधून कडाक्याची थंडी पडत असल्याने वातावरणातील या बदलाने रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी थंडीच्या दिवसात उबदार कपडे आणि दररोज पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. तसेच गरजेच्या वेळीच घराबाहेर पडावे.- डॉ. सुनील उन्हाळे
येवला तालुक्यातील शेतकरी भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:36 PM
येवला तालुक्यातील वातावरण सातत्याने बदलत असून, दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुके सकाळी ११ वाजेपर्यंत राहात असल्याने रब्बी हंगामातील पिके रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत आहेत, तर या हवामानाचा फटका आरोग्यावरदेखील होत असल्याचे दिसून आले असून, साथीच्या आजाराचे रुग्ण घरोघरी दिसू लागले आहेत.
ठळक मुद्देहवामान बदल : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला; फवारणीचा खर्च वाढला