नाशिक : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ या शास्त्रीय संगीत मैफलीत गायक सम्राट पंडित यांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारकात बुधवारी (दि. २८) कोलकाता घराण्याचे कोलकाता येथील गायक सम्राट पंडित यांच्या स्वरांनी नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. त्यांनी राग यमन सादर करताना रसिकांची मने जिंकली. सम्राट पंडित यांच्या ख्याल गायनाला रसिकांनी उत्स्फू र्त दाद दिली. त्याचप्रमाणे ठुमरी गायनालाही रसिकांची पसंती मिळाली. त्यांना तानपुºयावर अजिंक्य जोशी व पंकज इनामदार यांनी, तर तबल्यावर नितीन वारे यांनी संगीतसाथ केली. संवादिनीवर सुभाष दसककरांनी स्वरसंगत केली. यावेळी कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित संगीत मैफलीला नाशिककर रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान, सम्राट पंडित यांनी लहानपणी वडिलांसोबत नाशिकला आल्याच्या आठवणींना उजाळा देत कुसुमाग्रजांच्या भूमीत कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सम्राट पंडित यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:46 AM