सायखेडा : रमजान महिन्याला बुधवारपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे. इस्लामी वर्ष हे चंद्रावर आधारित असल्याने यातील महिने नेहमी फिरत असतात. ३ वर्षांत ऋतूचे एक चक्र पूर्ण होते. त्यामुळे तिन्ही ऋतूंत पवित्र रमजान येत असल्याने यावर्षी तो उन्हाळ्यात आला आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना रखरखत्या उन्हात किमान १४ तासांचा रोजा राहणार आहे.इस्लाम धर्मात रमजान महिन्याला बरकतीचा महिना असेही म्हटले जाते. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव अल्ला ईश्वराची प्रार्थना करतात. प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी रोजा ठेवतात. रोजाच्या अवस्थेत अन्नपाण्याच्या सेवनास सक्त मनाई असते. पोटाची भूक, पाण्याची तहान याची जाणीव प्रत्येकाला व्हावी, यासाठी इस्लामने रोजे अनिवार्य केले आहे.पहिल्या रोजाला बुधवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुरुवात झाली. संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी रोजा सोडण्यात येत असून रोजेकरांना १४ तास अन्न, पाण्याविना इतरही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. या पवित्र महिन्याच्या दिवसांमध्ये पवित्र कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन केले जाते. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनामुळे मुस्लिम बांधव घरातूनच नमाज अदा करत आहेत. पृथ्वीवरील कोरोनाचे संकट दूर होऊन शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी या पवित्र महिन्यात अल्लाहकडे विशेष दुआ मागण्यात येत असल्याची प्रतिक्रिया औरंगपूरच्या उपसरपंच अमीना इनामदार यांनी दिली आहे.