खर्डे : देवळा तालुक्यातील खुंटेवाडी, खर्डे परिसरातील ग्रामस्थ तीव्र पाणीटंचाईने हैराण झाले असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा ठरत आहे.परिसरातील चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, वºहाळे, महात्मा फुलेनगर, डोंगरगाव येथे टॅँकरद्वारे पाणीपुरवठासुरू आहे. पैकी खुंटेवाडी येथे शनिवारपासून (दि.१६) पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील पश्चिमेकडील खर्डे, वाजगाव, कणकापूर, वडाळा, शेरी, वार्शी, कांचणे, हनुमंतपाडा आदी ठिकाणीदेखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणीदेखील टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.खर्डे परिसराला वरदान ठरणाऱ्या वार्शी धरणातील पाण्याचा अवैध उपसा झाल्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळेच खर्डे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीनेदेखीलतळ गाठल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे., तोही अशुद्ध होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खर्डे गावाला पाणीपुरवठा करणाºया तीन विहिरी असून, दोन बोअरवेल आहेत; मात्र पाणीपुरवठा वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने दखल घेऊन परिसरातील गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
खर्डे परिसरात तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 1:36 AM