नाशिक : कोरोनाच्या प्रारंभापासून बळींच्या संख्येत कोरोना बळींचा वेग सातत्याने नाशिक शहरात अधिक राहिला आहे. मात्र गत आठवड्याच्या उत्तरार्धात दोन वेळा ग्रामीणचे बळी शहरापेक्षा जास्त आणि एकदा एकसमान झाल्याने चिंतेत भर पडली आहे. नाशिक महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील बळींमधील फरकदेखील केवळ शंभरवर आल्याने एकूण मृत्यूंमध्ये ग्रामीण भाग महापालिकेला ओलांडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रात मिळून १ हजार १०२ बळी, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार २४५ मृत्यूंची नोंद झाली आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून २१८ व जिल्हा बाह्य ८६ अशा एकूण २ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ५४२ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत ३७ हजार १०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत २ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ९७२, चांदवड १ हजार १४५, सिन्नर १ हजार ३४०, दिंडोरी ८३८, निफाड २ हजार ३१३, देवळा १ हजार ३२९, नांदगाव ८२५, येवला ४१८, त्र्यंबकेश्वर ३९४, सुरगाणा २१७, पेठ ९५, कळवण ६२०, बागलाण १ हजार २८८, इगतपुरी ५६४, मालेगाव ग्रामीण ९४८ अशा एकूण १३ हजार ३०६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ५५६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३५, तर जिल्ह्याबाहेरील ४१० असे एकूण ३७ हजार १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रविवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख २६ हजार ३०० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८२ वर
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८०.५२ टक्के, नाशिक शहरात ८३.६५ टक्के, मालेगावमध्ये ७८.८० टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३२ टक्के आहे. सरासरी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ८२.४३ टक्के घसरण झाली आहे.