नांदगाव : उच्च दाबाचा वीजप्रवाह असलेल्या तारांपैकी एक तार निखळून पडल्याने जामदरी येथील तीन म्हशींचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या घटनेला तीन महिने झाल्यानंतरही वीज वितरण विभागाने नुकसान भरपाई बाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ येथील जुन्या तहसिलसमोर उपोषण करण्यात आले. प्रहार संघटनेचे नेते शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त संजय पिरनाईक यांच्या कुटूंबियांनी व जामदरी च्या ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाच्या या अनागोंदी विरोधात उपोषण केले मनसे तालुकाध्यक्ष दिपक म्हस्के, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सुर्यवंशी गंगाधर औशेकर ,तानसेन जगताप,किरण गवळे,भाऊसाहेब पवार,पांडूरंग जाधव आदी या उपोषणात सहभागी झाले होते. जामदरी येथील संजय पिरनाईक यांच्या मालकीच्या जाफराबादी म्हशी चरत असताना वरून विजेचा प्रवाह असलेली तार निखळून पडल्याने हा अपघात घडला. हा प्रकार गेल्या सप्टेंबरमध्ये घडला होता. अल्पभूधारक असलेल्या शेतकºयाने जोडधंदा म्हणून या म्हशी विकत घेतल्या होत्या. तिन्ही म्हशीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानंतरही वीज वितरण विभागाने नुकसान भरपाईबाबत कसल्याही प्रशासकीय हालचाली केल्या नव्हत्या. उपोषण सुरु झाल्यावर वीज वितरण विभागाने वेहेळगावच्या अभियंत्यांना उपोषणस्थळी पाठविले अभियंता सोनटक्के यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. वीज निरीक्षक यांच्या अभिप्रायानंतर वरिष्ठाना अहवाल पाठविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
नांदगावी शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:41 PM