लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नियमित कर्ज भरणाऱ्या सटाणा (दक्षिण भाग) सेवा संस्थेच्या संचालकांनी पीककर्ज मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. १५) जिल्हा बॅँकेसमोर उपोषण केले. बँकेने दिलेल्या मुदतीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी सोसायटीच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन बँकेने दिले होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या खरीप हंगामात (२०१६-१७) पीककर्जाची मर्यादा वाढविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेची आर्थिक पत घसरली आणि हजार व पाचशे रु पयांच्या स्वरूपात ३४२ कोटी रु पये बँकेच्या तिजोरीत जमा झाले. हे चलन अद्याप रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेले नाही. यामुळे बँकेत चलन तुटवडा निर्माण झाला असून, दैनंदिन व्यवहारांत वितरणासाठीदेखील बँकेकडे पैसा शिल्लक राहिला नाही. परिणामी हक्काचे पैसे मिळत नसल्याच्या कारणास्तव जिल्ह्णातील शिक्षकांनी जिल्हा बँकेवर मोर्चा काढला होता. यानंतर शिक्षकांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेकडे वर्ग करण्यात आली आहेत. शिक्षकांचा प्रश्न मिटण्यापूर्वीच आता नियमित कर्ज फेडणाऱ्या सोसायटी सभासदांनी पुढील खरीप हंगामासाठी पीककर्जाची मागणी केली आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थेस बँकेने ४ मार्च रोजी कर्जपुरवठा करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे सटाणा (दक्षिण भाग) विविध कार्यकारी सेवा संस्था, मळगाव आणि इजमाने आदि सोसायटी सभासदांनी उपोषण सुरू केले. बँकेसमोर राजेंद्र सोनवणे, भिका सोनवणे, पांडुरंग सोनवणे, राहुल सोनवणे, दौलत सोनवणे, शरद सोनवणे, राजेंद्र गायकवाड, दोधा मोरे, नीलेश सोनवणे, शांताराम सोनवणे, दौलत सावकार, सुरेश धोंडगे, भगवान सोनवणे, किशोर धोंडगे, शिवाजी धोंडगे, गंगाधर धोंडगे आदि उपोषणात सहभागी झाले होते.
सटाण्याच्या संचालकांचे नाशकात उपोषण
By admin | Published: May 16, 2017 1:15 AM