सुरगाण्यात विविध शासकीय कार्यालये व निवासस्थाने आहेत, अशा सर्व इमारतींचा अनेक वर्षांपासून वापर झाला नसल्याने या इमारतींना अवकळा प्राप्त झाली आहे, तर दुसरीकडे बहुतांश कार्यालये खासगी इमारतीत सुरू आहेत. या इमारतींची दुरुस्ती करून खासगी जागेत सुरू असलेले कार्यालय या इमारतीत सुरू करण्याची आवश्यकता होती. तसे न झाल्याने शासनाची कोट्यवधी रुपयांची ही मालमत्ता तशीच पडून असून, अजूनही दुर्लक्षितच आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील एकेकाळी गजबजलेल्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याठिकाणी गटविकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे व आरोग्य विभागाचे कर्मचारी कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यामुळे हा परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर असायचा. नंतरच्या काळात कुणी बदली झाल्याने तर कुणी अन्य कारणांमुळे एकेक करून ही भक्कम दगडी निवासस्थाने सोडून गेली. याठिकाणी त्यांच्यामागे मोजके लोक राहण्यास आले, नंतर तेही गेल्याने ही निवासस्थाने एकेक करून ओस पडली आणि या इमारतींना अवकळा आली. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी असलेला बंगलाच गायब झाला आहे, तर बंगल्यासमोरील दगडी खोल्या असलेल्या चाळीची चाळण झाली आहे.
येथील पोस्ट कार्यालयासमोर असलेल्या चाळीत तलाठी कार्यालय वगळता कुणीही राहत नसल्याने ही चाळ ओस पडली आहे, तर मशिदीशेजारच्या चाळीचे तर अस्तित्वच नष्ट झाले आहे. मेनरोडवरील शेतकी इमारतीची दुर्दशा झाली आहे. पोलीस निरीक्षक व नायब तहसीलदार यांच्यासाठी असलेल्या निवासस्थानी सुविधा नसल्याने हे निवासस्थान अधिकाऱ्याविना ओस पडले आहे. तहसीलदार यांच्यासाठी स्वतंत्र बंगला असून, याठिकाणी सुविधा नसल्याने हा बंगला देखील एकाकी पडला आहे. जिल्हा परिषद शाळांचे तालुका कार्यालय एकेकाळी गजबजलेले असायचे. काही वर्षांपासून ते देखील एकांतवास भोगत आहे. याच कार्यालयामागील बांधकाम विभाग अधिकारी निवासस्थानाची देखील तीच परिस्थिती आहे. बहुतेक इमारतींचे अवशेष दिसतात तर काही ठिकाणी काहीच शिल्लक राहिलेले नाही.
इन्फो
वेळीच लक्ष घातले असते तर...!
भग्नावस्थेत असलेल्या शासकीय इमारतींकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी मार्च २००९ मध्ये करण्यात आली होती; मात्र दुर्दैवाने लक्ष घातले गेले नाही. त्याचवेळी लक्ष घालून या सर्व शासकीय कार्यालय व निवासस्थानांची दुरुस्ती व सुविधा दिली असती तर काही लाखांमध्येच खर्च आला असता. या ठिकाणी अधिकारीवर्ग, कर्मचारी आनंदाने राहिले असते. आता पंचायत समिती अधिकारी, आरोग्य अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदींसाठी असलेली ही निवासस्थाने नवीन व सुविधायुक्त बांधण्याची गरज निर्माण झाली आहे, तसे झाल्यास ओस पडलेल्या या इमारतींना गतवैभव प्राप्त होईल.
फोटो- १४ सुरगाणा खबरबात
सुरगाणा येथील दुर्दशा झालेले शासकीय निवासस्थान.
140721\14nsk_16_14072021_13.jpg
फोटो- १४ सुरगाणा खबरबातसुरगाणा येथील दुर्दशा झालेले शासकिय निवासस्थान.