मालेगाव परिसरात ठाकरे जयंती साजरी
मालेगाव : शहर परिसरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मोसम पुलावरील शिवभोजन केंद्रात नागरिकांना मोफत पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
जुन्या आग्रा महामार्गावर वाहतूककोंडी
मालेगाव : शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन बसस्थानकापासून दरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी अवजड वाहने उभी असल्याने वाहतूककोंडी होते. शहर वाहतूक पोलिसांनी अवैधरीत्या रस्त्यांवर लावलेल्या अवजड वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सचिन पगारे यांना प्रेरणा पुरस्कार
कुकाणे : येथील रहिवासी व मविप्र संस्थेचे देवगाव शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक सचिन पगारे यांना निसर्गमित्र समितीतर्फे स्वामी विवेकानंद प्रेरणा पुरस्कार सहायक पोलीस निरीक्षक पारधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडनेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, माजी आमदार संजय चव्हाण, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, सटाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, डॉ. सयाजी पगार, भाऊसाहेब अहिरे आदी उपस्थित होते.
रावळगाव महाविद्यालयात नेताजी सुभाष बोस जयंती साजरी
कुकाणे : रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण येवले होते. प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. अंबादास पाचंगे, शरद अंबेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन उपप्राचार्य गौतम निकम यांनी केले. आभार प्रा. भरत आहेर यांनी मानले.