कळवण : ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आल्यानंतर विकासकामांसाठी शासन यंत्रणेचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ नवनिर्मित नगरपंचायतीवर आली असताना कळवण शहरातील विकासकामांच्या मदतीला मात्र राज्यसभेचे तीन सदस्य धावून आले आहेत. खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी, डी.पी. त्रिपाठी व हुसेन दलवाई यांनी शहरांतर्गत विकासकामांसाठी एक कोटी ३० लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळून निघाले आहे.कळवण ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्याने जादा निधी उपलब्ध होईल, विकासाची कामे वेगाने होतील अशी अपेक्षा नागरिक व नवनियुक्त लोकप्रतिनिधींची होती; पण नगरपंचायतीची निर्मिती होऊन तब्बल तीन वर्षे झाली तरी विकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधीच मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असून, परिणामी वॉर्डातील विकासकामे ठप्प झाली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतींना शहर विकासाच्या कामाचा अनुशेष भरून काढता यावा म्हणून शासनातर्फे विशेष विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु कळवण नगरपंचायतीला या निधीपासूनदेखील वंचित ठेवण्यात आले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी, हुसेन दलवाई आणि डी.पी. त्रिपाठी यांची वेळोवेळी भेट घेऊन शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले होते. कळवण शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्ते दुरु स्ती करण्याबाबतचा अहवाल शासकीय यंत्रणेकडून तीनही खासदारांना सादर झाल्यानंतर त्यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि त्याची पूर्तताही केली. कळवण नगरपंचायत हद्दीतील रस्ते विकासासाठी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ५० लाख रु पये, डी. पी. त्रिपाठी यांनी ५० लाख रु पये तर हुसेन दलवाई यांनी ३० लाख रु पये निधी दिला असून, त्यातून शहरातील रस्त्यांची कामे करतानाच अन्य कामेही केली जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली.