तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील हिवरेजवळील वाघदरावाडी येथे राहणाऱ्या खोडके कुटुंबात सदर घटना घडली. विश्वनाथ विठ्ठल खोडके (५२) हा दारू पिऊन आई भारताबाई हिला शिवीगाळ व मारहाण करीत होता. शनिवारी (दि. १२) वडील विश्वनाथ दारू पिऊन घरी आल्यानंतर त्यांनी आई भारताबाई हिला शिवीगाळ व मारहाण केली. त्याचा राग अनावर न झाल्याने मुलगा नवनाथ विश्वनाथ खोडके (२५) याने लाकडी दांडका वडिलांच्या डोक्यात मारला. यात विश्वनाथ खोडके गंभीर जखमी झाले. त्यांना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तथापि, मार गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. विश्वनाथ खोडके यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (दि.१३) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी भारताबाई यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात मुलगा नवनाथ याच्याविरोधात तक्रार दिली.
इन्फो
चार दिवस पोलीस कोठडी
पोलिसांनी संशयित नवनाथ विश्वनाथ खोडके (२५) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित नवनाथ यास अटक केली असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी अधिक तपास करीत आहेत.